Print
Hits: 2753

सकाळ वृत्तसेवा
१० डिसेंबर २०१०
पुणे, भारत

स्वतः अंध असूनही अंध आणि अपंगांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाची सुरवात करणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे राहुल देशमुख. "नॅशनल असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज्ड' या संस्थेमार्फत राहुल अंध व अपंग मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी धडपडत आहे. त्यांच्या या संस्थेचा उद्‌घाटन समारंभ नुकताच पार पडला.

कुमठेकर रस्त्यावरील कुंजीर तालमीजवळ असणाऱ्या अण्णाभाऊ साठे विद्यालयात राहुलच्या "स्नेहांकित' आणि "नॅशनल असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज्ड' या दोन संस्थांचा कारभार चालतो. स्नेहांकितमार्फत अंधांसाठी तर, नव्या संस्थेमार्फत अपंगांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. समाजसेवेची आवड असणारी आणि पगाराची कोणतीच अपेक्षा नसणारे काही डोळस तरुण व ज्येष्ठ मंडळी या कामात राहुलची मदत करतात.

याबाबत राहुल म्हणाला, 'आमच्यासारख्यांना अगदी मोजक्‍या संधी उपलब्ध आहेत. शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असणाऱ्यांनाच त्याचा फायदा होतो. आजच्या संगणकाच्या युगात अंध-अपंगांना विशेष संगणक व व्यावसायिक प्रशिक्षण वर्गांची गरज आहे; परंतु या सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन स्नेहांकितमार्फत अंधांसाठी संगणक प्रशिक्षण वर्गाची सुरवात करण्यात आली. त्याच धर्तीवर आता अपंगांसाठीही विशेष संगणक प्रशिक्षण वर्गांची सुरवात केली आहे.''

त्याच्या या कामाला समाजाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल तो म्हणाला, ""शासनाकडून अद्याप मदत मिळालेली नाही. निधी नसल्याने संस्थेची माहितिपत्रके छापता येत नाहीत. रोटरी क्‍लबच्या धर्मराज खेणींनी एक लाख रुपयांची मदत केली. त्यातून ग्रामीण भागातून आलेल्या अपंगांसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे.'' त्याच्या या संस्थेमार्फत अंध - अपंग व्यक्तींसाठी अत्याधुनिक डिजिटल ग्रंथालय, मनोरंजन केंद्र चालविले जाते. या दोन्ही प्रशिक्षण केंद्रांमार्फत अंध- अपंग विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांच्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात विशेष वसतिगृह उभारण्याचा मानस त्याने या वेळी बोलून दाखविला.

शासनदरबारी हेलपाटे
आमच्या संस्थेला रोटरी सोडल्यास अजूनपर्यंत कोणीही विशेष मदत केली नाही. नगरसेवक - पुढाऱ्यांशी चांगली ओळख असणाऱ्यांच्या छोट्या संस्थांनाही मोठी आर्थिक मदत मिळते. पण, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या संस्थेला शासनाची मदत मिळविण्यासाठी सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. पदरी निराशा पाडून घेण्यापेक्षा तो वेळ मला या कामी वापरता यावा, यासाठी आता कुठे फिरत बसत नाही, राहुल देशमुख यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.