सकाळ वृत्तसेवा
०८ मे, २०१०
मुंबई, शहापूर, भारत
अर्धवट झोपेत असलेल्या वॉर्डबॉयने मृतदेहाऐवजी दुसऱ्याच एका रुग्णाला मृत समजून त्याचे सलाईन काढून त्याच्या नाका-तोंडात कापूस कोंबल्याने रुग्णाला प्राण गमवावा लागण्याची सायन रुग्णालयातील घटना ताजी असतानाच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आणखी एक नमुना शहापूरमध्ये उघडकीस आला आहे. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या बेफिकिरीमुळे आदिवासी महिला फरशीवरच प्रसूत झाली आणि नवजात बालकाला जीव गमवावा लागला आहे. या प्रकारामुळे शहापुरात खळबळ माजली असून प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेल्या अन्य दोन महिलांच्या धास्तावलेल्या नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
आमदार दौलत दरोडा यांच्या कोठारे गावच्या आदिवासी महिला कांता शंकर दरोडा दोन दिवसांपूर्वी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्याने तिच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी दुर्लक्षच केले. अखेर ही महिला टॉयलेटकडे चालत जात असताना फरशीवरच प्रसूत झाली. जन्मलेल्या बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर त्वरित उपचार होणे गरजेचे होते. त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले जात असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील कल्पना पांडे (काष्टी) आणि रविना दिनकर (अन्सोली) या महिलाही प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासमोरच हा सारा प्रकार घडला. त्यांच्याकडेही रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने धास्तावलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविले आहे.
शहापूरचे आमदार दरोडा यांना याबाबतची माहिती कळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन शेरेबुकात अत्यंत कडक शब्दांत रुग्णालयातील कारभारावर ताशेरे ओढले आहेत. रुग्णालयासाठी जनरेटर असूनही भारनियमनाच्या आठ तासांत रुग्णालयात अंधार असल्याने रुग्णांना विशेषतः नवजात बालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत फटकारले. आदिवासींना औषध-गोळ्या किंवा सिरिंज बाहेरून आणावयास लागत असल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.
खुलासा मागविला
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल सावंत यांना विचारले असता संबंधित डॉक्टर आणि परिचारिका यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आता याबाबत काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारी रुग्णालयात फरशीवरच प्रसूती
- Details
- Hits: 3239
0