सकाळ वृत्तसेवा
०८ सप्टेंबर २०१०
मुंबई, भारत
किडनीची व्याधी "श्रीमंत' व्याधी समजली जाते. एखाद्या गरीब रुग्णाला हा विकार झाला, तर त्याच्या उपचारासाठी करावा लागणारा खर्च त्याला झेपत नाही. प्रत्येक आठवड्यामध्ये करावे लागणारे डायलिसिस महागडे असते. गोरगरिबांची ही अडचण ओळखून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वर्षापासून डायलिसिस सेंटरची सुरुवात करण्याचे ठरविले आहे. नाममात्र शुल्कामध्ये या वैद्यकीय सेवेचा लाभ गोरगरीब रुग्णांना घेता येणार आहे.
मंडळ गेल्या 75 वर्षांपासून गरजू व्यक्तींना मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत आहे. शहरातील प्रमुख पालिका रुग्णालयांमधील गोरगरीब रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदतही हे मंडळ करते. डायलिसिस केंद्र सुरू करण्यासाठी लोअर परळ येथे तीन हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध करून देण्याची परवानगी मंडळाने पालिकेकडे मागितली होती. पालिकेने ही जागा देण्यास संमती दिली असून, दसऱ्यानंतर हे केंद्र सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा तपासणी केंद्रासोबत 16 डायलिसिस मशीन्सदेखील येथे असतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश खनकर यांनी "सकाळ'ला दिली. या केंद्राच्या उभारणीसाठी लागणारे वैद्यकीय मार्गदर्शन के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक करणार आहेत. यापूर्वी किडनीची व्याधी असणाऱ्यांचे वयोमान चाळीस ते पन्नास या वयोगटातील होते; मात्र आता लहान मुलांमध्येही हा त्रास मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. त्यामुळे अन्य अनेक दुखण्यांप्रमाणे या व्याधीकडेही योग्य वेळी लक्ष देण्याची गरज आता शहरातील किडनीशास्त्र विषयांतील पारंगत तज्ज्ञांना वाटू लागली आहे. म्हणूनच या आरोग्य केंद्राचा लाभ अनेक गरजूंना होणार आहेच; शिवाय या ठिकाणी असणाऱ्या मार्गदर्शन शिबिरांमधून ही व्याधी होऊ नये यासाठीही विशेष चर्चासत्र होणार आहे.
लालबागचा राजा मंडळ डायलिसिस केंद्र उघडणार
- Details
- Hits: 2124
0