Print
Hits: 2634

सकाळ वृत्तसेवा
१४ जुलै २०१०
पुणे, भारत

रुबी हॉल रुग्णालयाने प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कराराचा भंग केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना स्थायी समितीने मंगळवारी महापालिका प्रशासनाला दिली. रुग्णालयाकडून करारानाम्यातील अटींचे पालन होते की नाही, याचा अहवाल दर आठवड्याला समितीपुढे ठेवण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले.

महापालिकेने शहरातील अनेक खासगी रुग्णालयांना जागेसह विविध प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. त्या सवलती देताना त्या मोबदल्यात शहरातील गरजू रुग्णांना औषधोपचारांत सवलत देण्याची अट रुग्णालयांवर घालण्यात आली होती. मात्र, या रुग्णालयांकडून या अटींचे पालन होत नसल्याचे उघडकीस आल्याने गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी सभागृहाला दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त मच्छिंद्रनाथ देवणीकर यांची समिती नेमण्यात आली. मंगळवारी समितीच्या बैठकीत त्याबाबतचा अहवाल प्रशासनाकडून सादर करण्यात आला. दर आठवड्याला एका रुग्णालयाची माहिती घेऊन चर्चा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार रुबी हॉल रुग्णालयाने अटी व शर्तींचे पालन केले आहे की नाही, याची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये रुग्णालयाकडून अटींचा भंग करण्यात आला असल्याचे, तसेच वेळोवेळी रुग्णालयास फायदा कसा होईल, यासाठी करारनामा बदलण्यात आल्याचे समोर आले आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

बैठकीनंतर समिती अध्यक्ष अरविंद शिंदे, सभागृह नेते नीलेश निकम आणि नगरसेवक बाबू वागस्कर म्हणाले, ""महापालिकेने या रुग्णालयास 14 हजार 288 चौरस मीटर जागा देऊ केली आहे. ती जागा डिस्पेंन्सरीसाठी आणि त्यावर उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात 15 टक्के बेड सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या अटीवर देण्यात आली होती. मात्र, जागा दिल्यानंतर स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता न घेता प्रशासनाने परस्पर करारात बदल केला. बदल करण्यात आलेल्या करारनाम्यातील अटींचेदेखील पालन केले जात नसल्याचे बैठकीत उघडकीस आले. महापालिकेने आणि राज्य सरकारनेही रुग्णालयास वाढीव "एफएसआय' देण्यास मान्यता देताना काही अटी घातल्या होत्या. मात्र, त्यांचेही पालन रुग्णालयांकडून करण्यात आले नसल्याचे प्रशासनाने कबूल केले. यावरून प्रशासन आणि रुग्णालय यांनी संगनमताने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.''

रुग्णालयाशी फेरकरारनामा करा...
रुग्णालयाशी फेरकरारनामा करावा, त्यास रुग्णालयाने नकार दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, मान्यता न घेता करण्यात आलेल्या करारनाम्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यापुढे दर आठवड्यात करारातील अटींचे पालन होते की नाही, याची तपासणी करून समितीपुढे अहवाल सादर करावा, अशा सूचना स्थायी समितीने आयुक्तांना केल्याचे अरविंद शिंदे यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.