सकाळ वृत्तसेवा
३१ मे २०१०
पुणे, भारत
रुग्णांच्या विविध तपासण्या आणि त्यावरील होणारा खर्च वाढला असून, अशावेळी गरीब आणि सर्वसामान्यांना उपचार मिळण्यासाठी रुग्णांशी माणुसकीचे नाते निर्माण करणाऱ्या डॉक्टरांची गरज असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
जनकल्याण रक्तपेढीच्या भारत विकास परिषद पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. अशोकराव कुकडे होते. डॉ. अविनाश वाचासुंदर, डॉ. रमेश गोडबोले, डॉ. हिम्मतराव बावसकर, दत्तात्रेय चितळे आदी उपस्थित होते. महापौरांनी सर्वसामान्य, गरिबांना परवडेल अशा खर्चात उपचार उपलब्ध झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. कुकडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरल्याबद्दल खंत व्यक्त केली. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी समाजात काही ना काही तरी प्रयोग सुरूच असतात. उद्घाटन झालेल्या लॅबमध्ये कमी खर्चात तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे हादेखील अपप्रवृत्ती रोखण्याचा एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
रुग्ण दवाखान्यात गेला की, त्याला तपासण्या आणि औषधांची भली मोठी यादीच हातात मिळते. मात्र, रुग्णांकडे लक्ष द्यायला डॉक्टरांकडे वेळ नसल्याची खंत गोडबोले यांनी व्यक्त केली. काहीवेळा अनावश्यक चाचण्या करण्यास सांगितले जातात, तर पैसे नसल्याने काही रुग्णांना आवश्यक असूनही तपासण्या करणे शक्य होत नाही. ही दरी दूर झाली पाहिजे. यंत्रसामग्री, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग अशा अनेक कारणांमुळे तपासण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गरीब रुग्ण तपासणीपासून लांबच राहतात. पूर्वी पंचवीस चाचण्या होत होत्या, आता मात्र विविध प्रकारच्या तीनशे प्रकारच्या चाचण्या केल्या जात असल्याकडे गोडबोले यांनी लक्ष वेधले.
समाजाचे देणे लागतो, या भावनेने डॉक्टरांनी संशोधन केले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. बावसकर यांनी व्यक्त केली. रोगाचे निदान करण्यासाठी आता डॉक्टर तपासणी करण्याचा सल्ला जास्त देत आहेत. प्रत्येक वेळी तपासणी करण्यास सांगणे चुकीचे आहे. सरकारच्या निकषानुसार ग्रामीण भागात तर लॅबच सुरू करणे अवघड आहे. अशावेळी डॉक्टरांचा अभ्यासच पक्का हवा, असे त्यांनी नमूद केले.
रुग्णांशी माणुसकीचे नाते जोडणारे डॉक्टर हवेत
- Details
- Hits: 1942
0