लोकसत्ता
२५ एप्रिल २०१०
मुंबई, भारत
रक्तयज्ञात २५०६३ समिधा
शिवसेनेच्या विक्रमी रक्तदानाची नोंद गिनीज बुकमध्ये!

खास प्रतिनिधीओसंडून वाहणारी गर्दी, तरुणाईचा प्रचंड जल्लोष, प्रचंड संख्येने येणाऱ्या महिला हे चित्र सकाळपासून सायंकाळपर्यंत पाहावयास मिळत होते. ही गर्दी आयपीएलसाठी नव्हती, तर गोरेगाव येथील एनएसई संकुलात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदानाच्या महायज्ञासाठी होती. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या रक्तदानाच्या महायज्ञात रक्तदानाचा विश्वविक्रम मोडला जाणार हे सकाळी स्पष्ट झाले होते.
दुपारी तीन वाजताच रक्तदानाचा विश्वविक्रम मोडला जाऊन तब्बल १८०१९ बाटल्या जमा झाल्या होत्या.सायंकाळी सात वाजता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या सारा विलकॉक्स यांनी २५०६३ रक्ताच्या पिशव्या जमा होऊन विश्वविक्रम झाल्याचे घोषित केले तेव्हा शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. रक्ताचे नाते रक्ताशी जोडण्याचा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा संकल्प विश्वविक्रम होऊन प्रस्थापित झाला.
गोरेगावच्या एनएसई संकुलात सकाळी साडेसहा वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक येत होते. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सकाळी सात वाजता सर्वप्रथम रक्तदान केले. त्यांच्यासमवेत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. संजय ओक यांनीही रक्तदान केले. सकाळच्या वेळी लोकल गाडी पकडण्यासाठी जशी गर्दी असते तशी गर्दी गोरेगावला जमली होती. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व रक्तप्रेमी नागरिक वाजतगाजत रक्तदान करण्यासाठी येत होते. रक्तदानासारख्या सामाजिक कार्यक्रमासाठी चेंगराचेंगरी होण्याचा आणि गेट मोडला जाण्याचा अनुभव सारा विलकॉक्स यांच्यासह उपस्थितांनी अनुभवला. रक्ताचे नाते रक्ताशी जोडणारे असे हे अलौकिक, सामाजिक काम शिवसेनेच्या हातून घडले याचा मला सार्थ अभिमान वाटतो, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विश्वविक्रमानंतर व्यक्त केली. या रक्तदानाच्या महायज्ञात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे रुण मी कधीही विसरू शकणार नाही, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही एक ताकद आहे. चांगले काम करण्याची क्षमता आज आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केली. कृतज्ञतेच्या भावनेतून केलेले हे काम असून सर्वाच्या कष्टातून हा विक्रम घडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आनंद व्यक्त करतानाच रक्तदात्यांना अभिवादन केले. या रक्तदानामध्ये मोठय़ा प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. मात्र हिमग्लोबीन कमी असल्यामुळे अनेक महिलांना रक्तदान करता आले नाही. त्यामुळे लवकरच महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. हा विश्वविक्रम जाहीर करताना गिनीजच्या सारा विलकॉक्स म्हणाल्या की, सकाळपासून येणाऱ्या गर्दीने मी थक्क होऊन गेले. एखाद्या सामाजिक कामासाठी एवढी प्रचंड गर्दी पाहण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वीचा विश्वविक्रम हा १७९२१ रक्ताच्या पिशव्यांचा होता आणि आज २५०६३ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या आहेत.