सकाळ वृत्तसेवा
०८ जुलै २०१०
मोहझरी, भारत
मोहझरी येथे मागील अनेक वर्षांपासून मेडिकल कौन्सिलची कोणत्याही प्रकारची पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले असून, या डॉक्टरांनी लाखोंची माया जमविली आहे. मात्र, अशा बोगस डॉक्टरांवर पोलिस प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिनियम 1961 चे कलम 37 अन्वये अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश असले तरी या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागांतील अशिक्षित जनतेला भूलथापा देऊन या बोगस डॉक्टरांनी आपला गोरखधंदा सुरूच ठेवला आहे. आरोग्यसेवेचे ज्ञान नसताना हे बोगस डॉक्टर पैशाच्या लालसेपोटी ग्रामीण परिसरातील रुग्णांवर अघोरी उपचार करीत आहेत. परिणामी, काही रुग्णांना अपंगत्वसुद्धा आले आहे. हे असेच सुरू राहिले तर यांच्याच हातून रुग्ण मृत्यूच्या खाईत लोटला जाऊ शकतो.
वास्तविक या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार 25 ऑगस्ट 2009 च्या अधिनियमानुसार पोलिस प्रशासनास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहेत. पण, कारवाई करण्यास पोलिस धजावत नाहीत. ग्रामीण भागांतील अशा बोगस डॉक्टरांचा दुर्धर आजार असाच पसरत राहिल्यास अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही. राजरोसपणे चालणाऱ्या या बोगस डॉक्टरांच्या दुकानदारीवर प्रशासनाने विलंब न करता कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.