सकाळ वृत्तसेवा
१६ जुन २०१०
नाशिक रोड, भारत
महापालिकेच्या बिटको रुग्णालयातून मुदत संपलेल्या औषध-गोळ्यांचा पुरवठा होतो, असा आरोप करीत नाशिक रोड प्रभाग सभापती सौ. भारती ताजनपुरे यांनी बिटको रुग्णालयातील औषध पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेच्या चौकशीची मागणी आज केली.
प्रभाग कार्यालयात सौ. ताजनपुरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्याच बिटको रुग्णालयातील औषध वितरण व्यवस्थेचे बाभाडे काढले. याबाबत माहिती देताना सौ. ताजनपुरे यांनी दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना सांगितली. त्या म्हणाल्या, की माझ्या मुलाला काल (ता. 14) उपचारासाठी बिटको रुग्णालयात पाठविले होते. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला गोळ्या-औषधे दिली. मात्र, त्या घेतल्यानंतर त्याला आणखी त्रास झाला. रुग्णालयातून मुदत संपलेल्या औषध-गोळ्या माझ्या मुलाला दिल्यानेच त्याला मोठा त्रास झाला, असा आरोप सौ. ताजनपुरे यांनी केला. केवळ आरोपांवर त्या थांबल्या नाहीत, तर पत्रकारांना थेट बिटको रुग्णालयात नेऊन माहिती दिली.
गोळी मुदतबाह्य, पण एकच
बिटको रुग्णालयाच्या भांडारगृहात सौ. ताजनपुरे यांनी त्यांच्या मुलाला दिलेल्या गोळीचे नेमके पाकीट मागावून घेतले. नेमक्या त्याच गोळ्या मुदतबाह्य असल्याचे सर्वांसमक्ष उघड झालेल्या या चुकीबाबत संबंधित फार्मसी कर्मचाऱ्यानेही गोळी मुदतबाह्यच असल्याची चूक मान्य केली. तक्रार असलेल्या गोळीची मुदत 31 मे 2010 ला संपलेली होती.
आयुक्तांना अहवाल पाठविणार
या संदर्भात संबंधित कामाची जबाबदारी असलेले डॉ. डी. व्ही. पाटील म्हणाले, 'सौ. ताजनपुरे यांच्या मुलाला रात्री रुग्णालयातून चार-पाच प्रकारच्या गोळ्या-औषधे दिली गेली. त्यात 'फ्युराझोल्डिन' नावाच्या गोळीची मुदत 31 मेस संपलेली होती. मुदत संपल्यानंतर 15 दिवसांनी ती गोळी वितरित झाली, असा सकृतदर्शनी प्रकार आहे. त्याबाबत चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्याचे 'चूक मान्य झाल्याचे' पत्र आदी सर्व बाबतींत महापालिका आयुक्तांना अहवाल देणार आहे. पण फार घाबरण्यासारखी स्थिती नाही. लाख-दीड लाख रुग्ण येथे येतात. या घटनेने त्यांच्यात 'चुकीचा मेसेज' जाऊ नये असे वाटते.''