सकाळ वृत्तसेवा
०६ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत
""डोळ्यासारख्या अत्यंत नाजूक आणि महत्त्वाच्या अवयवावर शस्त्रक्रिया करताना नेत्र शल्यविशारदांनी स्वयंमूल्यांकन करणे गरजेचे आहे,'' असे मत प्रख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. टी. पी. लहाने यांनी आज (रविवारी) व्यक्त केले. "डोळ्याच्या विविध आजारांत बाहुलीला येणारी सूज' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

पुण्यातील "राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्था' (एनआयओ), अहमदाबाद येथील "रेटिना फाउंडेशन' आणि मुंबईच्या "आदित्यज्योत आय हॉस्पिटल'तर्फे येथील "यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी'त (यशदा) या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे नेत्रतज्ज्ञ संघटना आणि महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटना या परिषदेच्या आयोजनात सहभागी झाले होते. देश-विदेशातील सुमारे 325 नेत्रतज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. या वेळी "आदित्यज्योत आय हॉस्पिटल'चे डॉ. एस. नटराजन, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत केळकर, परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आदित्य केळकर, डॉ. पी. एन. नागपाल आदी उपस्थित होते.
डॉ. लहाने म्हणाले,"" नेत्र शस्त्रक्रिया हा अत्यंत नाजूक विषय असतो. त्यामुळे ती करणाऱ्या शल्यविशारदांनी कायम स्वयंमूल्यांकन करत राहणे गरजेचे असते. त्याचबरोबर व्यावसायिक कौशल्याबरोबरच प्रमाणिकपणा हा गुणही या तज्ज्ञांसाठी आवश्यक आहे. शस्त्रक्रिया करताना स्वच्छता आणि निर्जतुंक उपकरणे वापरण्याची सवय सगळ्यानांच असते. मात्र, अनवधानाने काही गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. शस्त्रक्रिया करताना वापरण्यात येणाऱ्या हातमोज्यांची स्वच्छता, त्यांना काही संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज असते. अनेकदा डॉक्टरांकडून या गोष्टींची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे मग शस्त्रक्रियेनंतर अडचणी उभ्या राहातात. नंतर त्यांचा सामना करण्याऐवजी आधीच घेतलेल्या खबरदारीमुळे अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात.'' डॉ. नटराजन यांनी आपल्या भाषणांत डोळ्यांवरील शस्त्रक्रियेच्या अत्याधुनिक पद्धतीची माहिती दिली. त्यांनीही डॉक्टरांच्या स्वयंमूल्यांकन आणि प्रामाणिकपणावर भर दिला.
दोन दिवसांच्या या परिषदेत डोळ्यांच्या बाहुलीला येणारी सूज, त्याची कारणे आणि त्यावरील विविध उपायांबाबत चर्चा करण्यात आली. अनेक मान्यवर नेत्रतज्ज्ञांनी या परिषदेत अत्याधुनिक उपचारपद्धतीबाबतचे सादरीकरण केले. विविध संसर्गांमुळे डोळ्यांच्या बाहुलीला होणाऱ्या आजराची माहिती आणि त्यावरील उपचार, बाहुलीच्या शस्त्रक्रिया याबाबतही तज्ज्ञांनी आपली मते मांडली.
डॉ. नटराजन यांना "डॉ. संदीप वाघ पुरस्कार'
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रांत; नेत्र शल्यचिकित्सा आणि डोळ्यांच्या आजरांसंबंधी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील "आदित्यज्योत आय हॉस्पिटल'चे संचालक डॉ. एस. नटराजन यांना "एनआयओ'तर्फे देण्यात येणाऱ्या "डॉ. संदीप वाघ स्मृती पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. पी. एन. नागपाल यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. पी. एन. नागपाल, डॉ. टी. पी. लहाने, जनरल वत्स या ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञांबरोबरच तळेगाव वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. प्राजक्ता सांबारे, नवले हॉस्पिटलमधील डॉ. सुवर्णा गोखले, डॉ. एस. नागपाल, ससून रुग्णालयाच्या डॉ. संजीवनी आंबेकर, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्नल आर. पी. गुप्ता, लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील ब्रिगेडियर अजय बॅनर्जी, जिल्हा अंधत्वनिवारण संस्थेचे डॉ. काकडे आदींचा धन्वंतरीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.