सकाळ वृत्तसेवा
२६ जुलै २०१०
पुणे, भारत
अपंग विद्यार्थ्यांचे शारीरिक, भावनिक व व्यावसायिक पुनर्वसन करणाऱ्या 'बालकल्याण' या संस्थेत आज मोठ्या अर्थपूर्ण रीतीने गुरुपौर्णिमा साजरी झाली. 'ऍबिलिटी अनलिमिटेड' या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक गुरू सैद सलाउद्दीन पाशा यांनी अपंगांसाठीच्या पुण्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना नृत्यनाट्याचे व व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनोपयोगी धडे दिले.
"रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया'द्वारे मान्यताप्राप्त "कंटिन्यूईंग रिहॅबिलिटेशन एज्युकेशन' (सीआरई) अंतर्गत 22 ते 24 जुलै असा तीनदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम येथे पार पडला. कर्णबधिर, मतिमंद, दृष्टिहीन तसेच अस्थिव्यंग असलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या विविध शाळांमधले 35 शिक्षक त्यात सहभागी झाले होते. औरंगाबाद, कोल्हापूर व उल्हासनगरहूनही पाच जण आले होते. अपंगांना जीवनोपयोगी शिक्षण देणाऱ्यांनी प्रथम त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, यासाठी जाणीवपूर्वक अनुभव घेण्यासाठीचे पाठ या प्रशिक्षणात होते. डोळे बांधून स्वतः चालणे, स्पर्शज्ञान वगैरेंतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भावविश्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला. प्रशिक्षणार्थींपैकी अपर्णा या कुबड्यांवर चालणाऱ्या शिक्षिकेला नृत्याचे धडे गुरू पाशांनी दिले. याप्रसंगी "बालकल्याण'च्या व्यवस्थापिका मिनिता पाटील व "सकाळ'च्या संचालिका मृणाल पवार उपस्थित होत्या.
रविवारी अनेक शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांना नृत्यनाट्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी खास दिल्लीहून काही अपंग कलावंत आले. त्यांनी चाकांची खुर्ची क्षणार्धात उलटीपालटी करत तिच्यावर भराभर नृत्यमुद्रा व काही योगासनांचा मनोरम आविष्कार घडवला.
आशिक उस्मान, निशिथ गुप्ता, विजयकुमार, अजय तन्वर व मनीष वर्मा या कलावंतांनी गुरू पाशांबद्दल भावोद्गार काढले. ते म्हणाले, 'आमच्यासारखे अनेक कलावंत गुरुजींनी घडवले आहेत. विविध देशांमध्ये होणाऱ्या आमच्या प्रयोगांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. अपंग म्हणून लहानपणी घरी सगळ्यांच्या काळजीचा, तर कधी हेटाळणीचा विषय झालेल्या आमची आकाशभरारी पाहून कुटुंबीयांना आता आमच्याबद्दल अभिमान वाटतो. "दया नको, संधी हवी' हा गुरुमंत्र आम्ही सतत म्हणतो. धडधाकटांना अशक्य वाटणारा नृत्य-नाट्य-योग- मार्शल आर्टचा संगम आम्ही गुरुजींमुळेच रंगमंचावर घडवतो.''