सकाळ वृत्तसेवा
१२ मे २०१०
रविंद्र माने
तासगाव, भारत
भोंदू वैदूंचा आणि बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट तालुक्यात झाला असल्याचे एका बोगस महिला डॉक्टरवरील कारवाई आणि वैदूंकडून झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग नक्की करतो काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचेच शुद्धीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यात अनेकांची वैदूंकडून फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. दहा हजार रुपयांपासून ते एक लाखांपर्यंतची फसवणूक असहाय रुग्णांची होत आहे. निमणी येथील एकाने भोंदू वैद्याकडून घेतलेल्या औषधोपचारात तब्बल पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्याने तालुक्यात आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
व्यवस्थित आरोग्य सेवा मिळत नसल्याने नाईलाजाने रुग्णांना चक्क वैदूंचा आधार घ्यावा लागत आहे आणि फसवणुकीचे प्रकार घडत असताना, शासकीय आरोग्य यंत्रणेला याचा पत्ताही लागत नाही हे गंभीर आहे. वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचणाऱ्या आरोग्य विभागाच्या बाबतीत भोंदू वैदूंचा पत्ता लावणे ही अवघड गोष्ट निश्चीतच नाही.
बोगस डॉक्टर शोधण्यात आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. निमणी येथील एका महिलेने इलेक्ट्रोपॅथी आणि नॅचरोपॅथीच्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन ऍलोपॅथीचा दवाखाना थाटल्याचे जिल्हा पोलिसप्रमुखांच्या विशेष पथकाने उघडकीस आणले होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद डावरे यांच्या गटातील येळावी प्राथमिक आरोग्य केंद्राला या गोष्टीचा पत्ता नव्हता, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. मटका जुगाराच्या अड्ड्यांप्रमाणे बोगस डॉक्टरांचे दवाखाने शोधण्याचेही काम पोलिसांनाच करावे लागणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील लोकांच्या दुर्दैवाने योग्य त्या आरोग्य सुविधा मिळत नसताना, दुसरीकडे भोंदू वैदू आणि बोगस डॉक्टरांचा उपचारांना बळी पडण्याची वेळ आली आहे.
तासगावात आरोग्य यंत्रणेवरच उपचारांची गरज
- Details
- Hits: 2930
0