सकाळ वृत्तसेवा
०१ जुन २०१०
नागपूर, भारत
"काका...अहो काका...तंबाखू खाता काय?' असा प्रश्न केल्यानंतर "होकारार्थी' उत्तर मिळताच डॉक्टर्स तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करीत होते. बसचालक, वाहक, बसमधून प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांपासून तर रिक्षा ओढणाऱ्या सुमारे पाचशेवर व्यक्तींचा आज नागपुरातील विविध भागांत दंत चिकित्सकांनी गुलाबाचे फूल देऊन सत्कार केला. निमित्त होते जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे.
इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे बैद्यनाथ चौक, बसस्थानक परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची आस्थेने विचारपूस केली जात होती. तंबाखू, विडी, गुटखा खाणारी व्यक्ती आढळल्यानंतर "तुम्ही कर्करोगाला आमंत्रण देत आहात', असा धोक्याचा इशारा देऊन गुलाबपुष्प देत सत्कार करण्यात येत होता.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका असतानाही धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, ही अतिशय गंभीर बाब असल्यामुळे इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हा अभिनव "गांधीगिरी' उपक्रम जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पर्वावर राबविण्यात आला. सुमारे पाचशेवर व्यक्तींना डॉक्टरांनी गुलाबपुष्प दिले.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी एक लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. यात 20 टक्के पुरुष तर पाच टक्के महिलांचा समावेश आहे. गरीबच माणूस तंबाखूजन्य पदार्थ विडीच्या आहारी गेला आहे. सिगारेटपेक्षा विडी घातक आहे. विडी ओढणारे गरीब, खेडेगावातील व ग्रामीण भागातील लोक आहेत. यामुळे नागपुरातील दंत चिकित्सकांनी बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या गावकरी, बसचालक, वाहक तसेच इतर व्यक्तींना रोखून त्यांचे दात तपासण्याचे कामही केले. तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्या काही नागरिकांना मात्र अवघडल्यासारखे वाटत होते. यामुळे डॉक्टरांचा सत्कार स्वीकारून काही व्यक्तींनी बसस्थानक परिसरात कॅन्सरची लक्षणे जाणून घेतली. काहींनी तंबाखू सोडण्याचा संकल्प करीत डॉक्टरांचे आभार मानले. तरुण पिढीला धूम्रपानापासून रोखायचे, असा संकल्प तरुण दंत चिकित्सकांनी केला.
डॉ. रवी दांडे, डॉ. संदीप फुलारी, डॉ. आर. एस. सबाने, डॉ. गिरीश भुतडा, डॉ. धनंजय बरडे, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. अभिनय देवा, डॉ. जयंत गायकी, डॉ. दीपकिशोर बिसेन, डॉ. श्वेता अग्रवाल यांच्यासहित अनेक डॉक्टर्स या उपक्रमात सहभागी झाले होते.