सकाळ वृत्तसेवा
११ ऑगस्ट २०१०
यवतमाळ, भारत
जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसूतिगृह रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर आहे. गर्भवती महिलेला कळा सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयातील वॉर्डापर्यंत पोचविल्या जाते. मात्र, तिथे पोचण्याच्या आत महिलेची प्रसूती चक्क आवारातच होते. अशा घटनांत आता वाढ झाली आहे.
हे आणि अशा अनेक समस्यांमुळे जिल्हा रुग्णालयात सात महिन्यांत तब्बल 97 नवजात बालकांचा मृत्यू झाला. याशिवाय, प्रसूतीसाठी आलेल्या नऊ मातांनाही प्राण गमवावे लागले.
ही आकडेवारी लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात दिवसाला सरासरी एक बालमृत्यू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अवस्था जिल्हा रुग्णालयाची आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयांचा विचार केल्यास बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे दिसते.
- 30 दिवसांत 15 प्रसूती आवारात!
रुग्णालयाच्या आवारात प्रसूती होणे ही बाब गंभीर आहे. आठवडाभरात या ठिकाणी अशा तीन ते चार घटना घडत आहे. महिनाभरात हा आकडा 15 ते 20 वर जात आहे. या गंभीर प्रकारामुळे अनेकदा जन्माला आलेल्या मुलाचा जागीच मृत्यू होतो. तर, कधी-कधी महिलेलाही मृत्यूशी सामना करावा लागतो.
- प्रशासन मात्र ढिम्मच
आवारात प्रसूती होण्यासारखे गंभीर प्रकार घडत असतानाही रुग्णालय प्रशासन कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाही. प्रसूतिगृह तळमजल्यावर स्थानांतरित करावे, यासाठी वारंवार अर्ज, निवेदने देण्यात आलेत. मात्र, प्रशासनाने ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतलेली नाही.
अधिकारी म्हणतात...
जिल्हा रुग्णालयातील अडचणींबाबत एका अधिकाऱ्याला विचारणा केली असता, ते म्हणाले, "अनेकवेळा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रामध्ये कर्मचारीच उपलब्ध नसतात. सध्या जिल्ह्यात 63 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 435 उपकेंद्र आहेत. ग्रामीण भागातील महिलांना प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात आणेपर्यंत ती महिला किंवा बाळाची परिस्थिती गंभीर होते. त्यानंतर उपचारादरम्यान महिलेला किंवा बाळाला मृत्यूशी झुंज द्यावी लागते. या अडचणी लक्षात घेता प्रत्येक उपकेंद्रामध्ये प्रसूतीसाठी आवश्यक सर्व साधनांनी परिपूर्ण प्रसूतिगृह बांधण्याचे ठरविण्यात आले होते. त्याकरिता शासनामार्फत एक कोटी 80 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्याचे काम थंडबस्त्यात आहे. मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश असतानाही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी कधीच मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिलांना जिल्हा रुग्णालयात आणावे लागते. मग अनेकदा रस्त्यातच प्रसूती होण्याच्या घटना घडतात. परिणामी, अनेक बालके मृत्युमुखी पडतात. या गंभीरप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून योग्य उपाययोजना करावी.'
सात महिन्यांतील नवजात बालकांचा/मातांचा मृत्यू
(1 जानेवारी ते 30 जुलै)
97 / 2
एक वर्षात नवजात बालकांचा/मातांचा मृत्यू
(1 जानेवारी ते 31 डिसेंबर 09)
359 / 9
जिल्ह्याच्या दुर्गम भागातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या काही जिल्ह्यांसह थेट आंध्रप्रदेशातील अनेक रुग्ण येथील वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज दाखल होतात. मात्र, अनेक समस्यांमुळे याठिकाणी आलेल्या रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच एक मुख्य समस्या आहे ती प्रसूती विभागाची.