सकाळ वृत्तसेवा
३० जुलै २०१०
मुंबई, भारत
शहरात मलेरियाचा फैलाव वाढता असल्याने गर्भवती व त्यांच्या बाळांना या साथीपासून रोखण्यासाठी आता स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ जागृती मोहीम राबविणार आहेत. मलेरियांच्या विषाणूंचा संसर्ग गर्भवतीला होण्याची शक्यता अधिक असते. तसे झाल्यास दिवस पूर्ण होण्याआधीच तिची प्रसूती होऊ शकते. ही भीती लक्षात घेऊन प्रसूतीतज्ज्ञ तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवतींना मलेरिया, तसेच इतर साथीच्या आजारांपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी, औषधे, तसेच डासांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये येणाऱ्या महिलांना आवश्यक ती काळजी घेण्यास प्रवृत्त करावे यासाठी मार्गदर्शिका बनविली जाणार आहे.
'गायनॅकॉलॉजी वर्ल्ड असोसिएशन'च्या संचालिका डॉ. धुरू शहा यांनीही या कामी पुढाकार घ्यायचे ठरविले असून, गर्भवती माता व तिच्या बाळाच्या दृष्टीने मलेरियाची साथीची लागण ही धोकादायक असू शकते, अशी भीती त्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास कमी दिवसांमध्ये मातेची प्रसूती होऊ शकते, तसेच अचानक अतिरिक्त रक्तस्राव होणे, चक्कर येणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यताही त्यामुळे नाकारता येत नाही. म्हणूनच माता व बाळाचे हित लक्षात घेऊन या महिलांकडे साथीच्या आजारांमध्ये विशेष लक्ष पुरविण्याची निकड डॉ. शहा यांनी व्यक्त केली आहे. मलेरिया झाल्यानंतर लाल रक्तपेशींची संख्या एकदम कमी होते, तसेच काही वेळा रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे शरीरातील ब्लड प्लेटस्देखील रोडावतात. त्यामुळे शहरांतील सार्वजनिक प्रसूती रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी प्रत्येक गर्भवती महिलेस हे सांगणे आवश्यक आहे; मात्र यंत्रणेवरचा एकूण ताण लक्षात घेता ही गोष्ट शक्य होईल, असे दिसत नसल्यामुळे याच साखळीमधील अन्य डॉक्टरांच्या पुढाकाराने ही जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
प्रसूतीदरम्यान शहरांत होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांची नोंद घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये ऍनिमिया हे गरोदरपणातील मृत्यूसाठीचे प्रमुख कारण पुढे आले आहे. मलेरियाची लागण झालेल्या गर्भवतीला ऍनिमिया होण्याचा धोका अधिक असल्याची माहिती पालिकेच्या कुटुंबकल्याण विभागाच्या विशेष अधिकारी डॉ. आशा अडवानी यांनी दिली. त्यामुळे ही लागण होण्याआधी गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढविणे, औषधांचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे. मलेरियाची लागण झाल्यानंतर अनेकदा बाळ व मातेला जोडणाऱ्या वारेमध्ये विषाणू स्थिरावतात, ते काही काळ निष्क्रिय राहिले तरी प्रसूतीनंतर त्याचा संसर्ग बाळास होऊ शकतो, असे मलेरिया या आजाराच्या विशेष अभ्यासिका डॉ. नीलिमा क्षीरसागर यांनी सांगितले.