सकाळ वृत्तसेवा
२० ऑक्टोबर २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत
कर्करोगासारख्या असाध्य व्याधीतून रुग्णांना बरे करण्यासाठी, अत्याधुनिक उपचार करणाऱ्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाने आता कर्करोग झालेल्या देशभरातील लहान मुलांसाठी पन्नास कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. "रुही' असे त्याचे नाव असून त्यातून या चिमुकल्यांना संपूर्णपणे मोफत उपचार दिले जाणार आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यातून कित्येक कर्करोगग्रस्त मुले उपचारासाठी टाटा रुग्णालयात येत असतात; पण या उपचारांचा डोंगराएवढा खर्च करण्याइतके या मुलांचे पालक सक्षम नसतात. अशा मुलांना या रुग्णालयात संपूर्ण वैद्यकीय खर्च मोफत मिळावा, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध स्वयंसेवी संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्ती रुग्णालयास विविध माध्यमातून देणग्या देत असतात; मात्र त्यातून उभा राहणारा निधी या आजाराशी झुंजत असणाऱ्या व्यक्तीसाठी पुरेसा नसतो. अनेकदा केवळ औषधोपचारांचा खर्च लाखांच्या घरात असतो.
उद्याचे भविष्य म्हणून ज्या मुलांकडे आशेने पाहिले जाते, त्यांच्याभोवती असलेली या आजाराची मगरमिठी सोडविण्यासाठी "टाटा'ने आता पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. डॉ. रोहिणी केळकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पान्वये पन्नास कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी अमित शेख या प्रख्यात धावपटूचे मोलाचे सहकार्यही लाभणार आहे. विविध कॉर्पोरेट कंपन्या, तसेच आरोग्याच्या प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या संस्थांनी पुढे येऊन याकामी मोलाची मदत करावी, असे आवाहन डॉ. केळकर यांनी केले आहे. मागील काही वर्षांच्या पाहणीमध्ये लहान मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढते आहे. केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून कित्येक पालकांना दारोदारी भटकावे लागते.
त्यातूनही गोळा होणाऱ्या निधीमध्ये औषधांचाही खर्च निघत नाही; पण आता वैद्यकीय सुविधांचा वाढलेला खर्च, त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मोजावी लागणारी किंमत लाखांच्या घरात आहे. त्यामुळे रुग्णालयाकडे असणारे आर्थिक बळही तितके पुरेसे नसल्याचा अनुभव डॉ. केळकर सांगतात. म्हणूनच "रुही'सारख्या प्रकल्पामधून उभा राहणारा पैसा हा केवळ लहान मुलांना या व्याधीतून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी खर्च करता यावा, असा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक, तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विधायक संघटनांच्या काही सदस्यांचाही या उपक्रमात मोलाचा सहभाग असेल. पहिल्या टप्प्यांमध्ये अमित शेख हे प्रख्यात धावपटू पुणे- मुंबई हे 36 तासांचे अंतर केवळ याच कारणासाठी पूर्ण करणार आहेत. त्यांच्या उद्देशाला पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना तसेच दानशूर व्यक्तीच्या मदतीने निधीची उभारणी करण्यात येणार आहे.