सकाळ वृत्तसेवा
०४ मे २०१०
मराठवाडा, नांदेड,सेलू, भारत
तणाव आणि धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय सर्वोदय मंडळाच्या निसर्गोपचार समितीचे राष्ट्रीय संयोजक डॉ. सच्चिदानंद शास्त्री यांनी सोमवारी (ता. तीन) केले.
श्रीरामजी भांगडिया रुग्ण सेवा मंडळ, गांधी स्मारक प्राकृतिक निसर्गोपचार चिकित्सा समिती व योग मंडळ आणि विनोद बोराडे मित्रमंडळातर्फे आयोजित सातदिवसीय प्राणायाम, योगासन व निसर्गोपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपनगराध्यक्ष विनोद बोराडे अध्यक्षस्थानी होते. आहारतज्ज्ञ डॉ. अहिंसा शास्त्री, हिंगोली जिल्हा व्यसनमुक्ती मंडळाचे संघटक विशाल अग्रवाल, प्रमोद गौशाल, शुभदा सरोदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शास्त्री म्हणाले, आधुनिक जीवनशैलीवर मात करण्यासाठी निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब करावा. संतुलित श्रम-विश्राम, संतुलित आहार, सुती वस्त्राचा वापर केल्यास रोगमुक्त होऊन निरोगी जीवन जगण्यास मदत होते. दैनंदिन आहारात षड्रसांचा स्वीकार करावा. प्रामुख्याने तुरट-कडू पदार्थांचा समावेश केल्यास चाळीस टक्के आरोग्य बळकटी होईल.
शिबिरात दोन सत्रांत पाठीच्या मणक्यांचे व्यायाम, मेरिडियन एक्झरसाईज, योगासने, प्राणायाम, आहारपद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. माती पट्टी, नेत्रस्नान, वमनक्रिया याबाबत शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रारंभी विशाल अग्रवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मंगल लड्डा, पूनम खत्री, चंद्रप्रकाश सांगतानी, मयाराम चेचिडिया यांनी मान्यवरांचे खादीची शाल व उपरणे देऊन स्वागत केले. नऊ मेपर्यंत सकाळी व सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत आयोजित शिबिरासाठी शिवनारायण मालाणी, भूपेंद्र राणा, रेवा कुंदनानी, पांडुरंग टाके, प्रा. शंकर गंधम, भगवान डासाळकर, भास्कर घोडके, आनंद रुगले, आनंद बाहेती, गोविंद कासट, वल्लभ राठी, श्री. वैद्य, श्री. माणकेश्वर, प्रा. प्रकाश कुरुंदकर हे पुढाकार घेत आहेत.
आधुनिक जीवनशैलीत निसर्गोपचाराची गरज
- Details
- Hits: 2991
0