खाऊचा डबा देताना
वर जे सर्व मुद्दे मांडले आहेत त्यांचा विचार करावा. पोषण आणि संवर्धन याबरोबर रोगप्रतिकार ही अन्नाची महत्वाची कार्ये असल्याने त्यालाच प्रथम प्राधान्य देऊन डब्यातील पदार्थांची योजना करावी.
खाऊच्या डब्यात (मधल्या वेळच्या) काय असावे?
१. शक्यतो पोळी- भाजी किंवा भाजी -भाकरी असावी.
२. वरचेवर उसळी असाव्यात मोड आणून उसळी कराव्या.
३. फ्लॉवर , बीट, गाजर, मुळा, या भाज्यांचा पाला बारीक करून डाळीसह भाजी बनवून द्यावी.
४. एखादे फळ रोज द्यावे. आवळा, पेरू, चिकू, पपई केळी ही फळे नेहमी सहज उपलब्ध होतात.
५. वरी, नाचणी अशा धान्यांचा वापर करून त्यांचे पदार्थ डब्यात द्या.
६. पोळीबरोबर गोड आवडणार्या मुलांना तूप व गूळ द्यावे.
७. बदल म्हणून डब्यात खजूर, गूळ शेंगाचा लाडू, चिक्की, चणे कुरमुरे असे पदार्थ आवर्जून द्यावे.
८. निरनिराळ्या भाज्यांचा समावेश असलेले पराठे मेथी पराठा, आलु पराठा इ. या भाज्यांनी युक्त पुर्या ही बनवता येतात. त्यामुळे मुलांना खायला आवडतील आणि बदलही होईल, पोषण मूल्यही जपले जाईल.
९. शेंगादाने, लसूण, खोबरे, डाळी, यांच्या चटण्या नेहमी पोळी/भाकरी बरोबर द्या. कच्या भाज्यांचे सॅलेड द्यावे.
१०. इडली, ढोकळा, थालीपीठ, असे पदार्थ द्यावेत. गोड आवडणार्यांसाठी लाडू, शिरा, घरात केलेली बालूशाही, पेढे असेही पदार्थ डब्यात द्यावेत. ११. अनेक धान्यांची पिठे एकत्र करून काही पदार्थ बनविता येतात. त्यांचा समावेश डब्यात करावा.
१२. निरनिराळ्या भाज्यांपासून बनविलेल्या वड्या तिखट/ गोड करून द्याव्यात
अशा रितीने विविधतेने पदार्थाची योजना केली तर मुले आवडीने खातील.
डब्यात देण्यायोग्य काही पदार्थाच्या कृती
पोषणमूल्य योग्य ठेवून रूचकर अशा पदार्थाच्या काही कृती खाली देत आहे. (काही गृहिणींशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने पुढील कृती देत आहे)
१. मेथीचे लाडू
साहित्य: १ वाटी मेथी, २ वाट्या कणिक, १ वाटी खोबरे किस, अर्धी वाटी खसखस, अडीच वाट्या गूळ, १ जायफळ, अर्धी वाटी खारकेची पूड, अर्धी वाटी, तूप. अर्धा लिटर निरस दूध ,५० ग्रॅम डींक, गूळ किंवा ४ वाट्या पिठीसाखर.
कृती:
अर्धा लिटर दुधात १ वाटी मेथी भिजत घालावी. ८ तासांनी ती चांगली बारीक वाटून घ्यावी व लगेच खरपूस परतून घ्यावी. नंतर त्याच कढईत कणीक भाजून खोबरे किस भाजून कुस्करून घ्यावा. खसखस भाजून कुटुन घ्यावी. डिंक तळून कुस्करून घालावा. जायफळाची पूड्क व खारकेची पूड त्यात मिसळावी. मिश्रण गरम असतानाच गूळ बारीक करून त्यात घालावा. म्हणजे लवकर मऊ होतो. मिश्रण सारखे करून त्याचे लाडू वळावेत.
२. पालेभाज्यांची भजी.
काही मुले पालेभाज्या खात नाही. त्यांना या कृतीचा फायदा होईल साहित्य: मुळा, नवलकोल, पालक यांचा पाला चण्याचे पीठ, तिखट, मीठ, भाजलेले तीळ, सोडा, सुके खोबरे, मिरे, ताक, हिंग इत्या.
कृती:
पाला व पाने बारीक चिरून घ्यावी. त्यात अंदाजाने तिखट, मीठ, हिंग, तिळ, खोबरे, मिरे, सोडा व आंबट ताक घालावे. पाणी घालू नये. सर्व एकत्र मिसळून त्यात मावेल एवढे चण्याचे पीठ घालून कालवावे, व त्या पीठाची गोल भजी तळून काढावी.
३. अनेक डाळींचा (मिश्र) ढोकळा
बर्याच गृहिणी चण्याच्या डाळीचा ढोकळा करतातच, त्यामध्ये वापरणारे सर्व साहित्य घ्यावे शिवाय दोन वाट्या तांदूळ, पाव वाटी चण्याची डाळ व पाव वाटी तुरीची डाळ.
कृती:
चण्याची डाळ, तुरीची डाळ व तांदूळ जाडसर दळून घ्यावे. रात्री अर्धी वाटी ताक व पाणी यात वरील पीठ भिजवून ठेवावे. सकाळी त्या भिजविलेल्या पिठात चण्याच्य डाळीच्या ढोकळ्यातील साहित्याप्रमाणे सर्व साहित्य घालून त्या ढोकळ्याप्रमाणे सर्व कृती करावी. या ढोकळा खाण्यामुळे मुलांना प्रथिने व कार्बोदके युक्त (डाळीपासून) आहार मिळतो. असे पदार्थ मुलांच्या डब्यात दिल्यास मातेचे कर्तुत्व आणि मातृत्व दोन्हीचा परिणाम होऊन मुलांचे पोषण चांगले होईल यात शंका नाही.
मुलांचा आहार - खाऊचा डबा देताना
- Details
- Hits: 13175
3
पोषक पदार्थ आणि अन्न
आहार म्हणजे काय?
