आहाराचं महत्त्व नव्यानं कुणी सांगायला नको! चरक या भिषग्वर्यांनी कैक वर्षापूर्वी आहाराचं महत्त्व प्रतिपादन करून ठेवलं आहे. कांदा वा इतर मसाल्याचे पदार्थ तामसी असतात. वगैरे म्हटलं जातं तेसुध्दा मानवप्राण्याला तसा अनुभव आला असेल म्हणूनच ना?
लढाईत सीमेवर लढणार्या जवानानं मद्यप्राश केलं तर कुणीही आक्षेप घेत नाही...... एखाद्या मुलाखतीला जाणार्या उमेदवाराला पूर्वी म्हणे सांगत असत ‘ब्रॅन्डीचा एक पेग घे!... रंगमंचावर पाऊल ठेवणारा नट ‘मद्याचा एखादा घोट’ पोटात ढकलूनच येतो पैसे किंवा भाषण झोडायला येणारा नवाशिका वक्ताही इतरांच्या सांगण्यामुळे- एक टूंक मारून येतो. हे सर्व कशासाठी? मनात उद्भवलेली वादळं शमविण्यासाठी मेंदूला शांत करण्यासाठी हे मद्यसेवन होत असतं!
मानसिक ताणतणाव हे आजच्या मानवी संस्कृतीचे अविभाज्य घटक बनून राहीले आहेत. पूर्वीचं ठीक होतं हो त्यावेळी मानवाला कपड्यालत्याची गरज नव्हती..... तो नंगा फिरायचा! त्याचं घरही एका गुहेत होतं आणि निसर्गदत्त आहारावर तो त्याची गुजराण करीत होता. पण मानवप्राण्यानं स्वत:चा विकास साधण्याचा प्रयत्न सुरू केला.
प्रगति-विकास-आधुनिकता अशी अनेक गोड नावं त्यानं चिटकवली आणि त्यासाठी तो रात्रंदिन झगडू लागला. यातून आधुनिक मानव निर्माण झाला. मानवाचा मेंदू नेहमीच सृजनशील! आधुनिकतेत आणखीन नवी आधुनिकता कशी आणता येईल या विचारानं तो आज झपाटलेला आहे. परंतु या सर्वाधुनिकतेच्या अंगाला लागूनच काही समस्या उद्भवल्या आहेत. दिवसेंदिवस आधुनिकतेच्या शोधाबरोबरच नवनव्या समस्या त्यानं चिकटवून घेतल्या आहेत. या अनेक समस्यांच्या यादीतली एक अग्रेसर समस्या म्हणजे चिंता!
हि चिंता सर्वांच्या पाचवीला पूजलेली असते. कुणाचं ‘पोट’ हातावर असतं. त्याला आजच्या ‘भाकरी’ची चिंता असते.. थोडं फार अर्थार्जन करणार्या मध्यमवर्गीय जिवनक्रमात प्रवेश करण्याचं जीव घेणं आकर्षण असतं. पण ते जमवता ही मंडळी बिचारी मेटाकुटीस येतात. श्रीमंताचं तर वेगळंच, अमाप समव्यावसायिकांशी स्पर्धा कशी करायची, येनकेन प्रकारे अमाप पैसा कसा कमवायचा ... शेअर बाजाराचे निर्देशांक बिचार्यांचे जीवन निर्देशांक चढाउतार करीत असतात. एकूण काय संघर्षमय, स्पर्धामय, तणावपूर्ण तथाकथित आधुनिक जीवनपध्दती सर्वत्रच नांदते आहे! पण याची तमा कुणाला? या ताणतणावांनी शरीराच्या चिंधड्या उडतात त्याचं काय योगासनासाठी डोळे मिटायचे आणि ‘आज कोणते शेअर विकत घ्यायचे याचा विचार करायचा ! असो ! यालाच आजचं यशस्वी जीवन म्हणतात!
मानसिक तणावावर इतरही अनेक उपाय शोधण्याची खटपट मानवाने अव्याहतपणे चालवली आहेच! त्यातला एक उपाय म्हणजे आहार! आहार सेवन ही माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. बर्याच आहारापायी अनेक रोगांचा उद्भव होतो हे दर्शवून दाखविण्याचा प्रयत्न नेहमीच आहार पोषण तज्ञांकडून केला जातो. म्हणूनच लोणी, तूप खाऊ नका तळलेले पदार्थ टाळा. मुतखडावाल्यांनी टोमॅटो सेवन टाळावं!
मांसाहार-मत्स्याहार केल्यानंतर दूध पिऊ नका. सांधेदुखीवाल्यांनी आंबट पदार्थ खाऊ नयेत. अशा प्रकारचे अनेक सल्ले दिले जातात. कधी कधी हे सल्ले उलटसूलटच असतात ! उदाहरणार्थ खोबरेल तेल वर्ज्य असं एकेकाळी ठणकावून सांगणारी संशोधक मंडळी आज सांगतात, ‘खोबरेल तेल मुळीच वाईट्ट नाही हो !’ हे सर्व ध्यानी घेऊनच आहाराचा उपयोग उपचारासाठी करता येईल का याचा वेध शास्त्रज्ञ आज काल घेत आहेत. उदाहरणार्थ मेदाचं प्रमाण अधिक असलेल्या आहाराचं सेवन केलं तर शरीरात किटोनमयता प्रमाण (एक प्रकारची रक्त आम्लता !) निर्माण होते. आणि लहान मुलांच्या काही विवक्षीत प्रकारातील अपस्मारावर ही किटोनमयता उपकारक ठरते ! अर्थात आहाराचा औषधीवापर संशोधकांनी कधीच सुरू केला आहे.
मानसिक ताणतणावात आहार - पोषणाचं स्थान
- Details
- Hits: 8408
7
पोषक पदार्थ आणि अन्न
आहार म्हणजे काय?
